धनंजय विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य एस. एम. पाटील यांचा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाकडून सन्मान
चंदगड : प्रतिनिधी "शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसतो, तर तो समाजाच्या भविष्याचा शिल्पकार असतो." या उक्तीचा प्रत्यय आपल्या कार्यातून देणारे मा. एस. एम. पाटील यांची धनंजय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नागनवाडी येथे प्राचार्यपदी झालेल्या निवडीबद्दल चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवेचा हा यथोचित गौरव असल्याची भावना संजय साबळे यांनी यावेळी व्यक्त केली.
मूळचे कडलगे बु. (ता. चंदगड) येथील सुपुत्र असलेले पाटील सर सन 1992 पासून सलग 34 वर्षे धनंजय विद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. अभ्यासू वृत्ती, शिस्तप्रिय स्वभाव, प्रामाणिकपणा, विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता आणि कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धती यामुळे त्यांनी विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
"*प्राचार्यपदी झालेली त्यांची निवड ही केवळ पदोन्नती नसून त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या निष्ठावान सेवेला मिळालेली योग्य दाद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली धनंजय विद्यालय ज्ञान, गुणवत्ता, संस्कार आणि शैक्षणिक प्रगतीची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास अध्यापक संघाचे समन्वयक रविंद्र पाटील सर यांनी व्यक्त केला.*
इयत्ता 5 वी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित व बुद्धिमत्ता विषयाचे दर्जेदार मार्गदर्शन करून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना यशाची वाट दाखवली आहे. तसेच इयत्ता 10 वी भूगोल विषयाचे सलग 15 वर्षे बोर्ड मॉडरेटर म्हणून अत्यंत जबाबदारीने काम करत शैक्षणिक गुणवत्तेचा उच्च आदर्श निर्माण केला आहे.
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह एच आर पाऊसकर,खजिनदार व्ही एल सुतार, समन्वयक रविंद्र पाटील, जिल्हा प्रतिनिधी संजय साबळे, विक्रम तुडयेकर उपस्थित होते .
याप्रसंगी अनेक शिक्षक, शिक्षणप्रेमी व मान्यवर उपस्थित होते. पाटील सरांच्या प्राचार्यपदी निवडीबद्दल चंदगड तालुक्यासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments