Type Here to Get Search Results !

अपंगत्वावर मात करत २६ वर्षे देशसेवेचा आदर्श; ईसीपी नाईक सुभेदार विष्णू भरमू मोटर यांचा गौरवशाली सेवानिवृत्ती

 अपंगत्वावर मात करत २६ वर्षे देशसेवेचा आदर्श; ईसीपी नाईक सुभेदार विष्णू भरमू मोटर यांचा गौरवशाली सेवानिवृत्ती



राकसकोप (परशराम गाडेकर )दि 2: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य राकसकोप गावातील सुपुत्र श्री. विष्णू भरमू मोटर यांनी देशसेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान गंभीर अपघातात कायमचे अपंगत्व आले, तरीही खचून न जाता त्यांनी जिद्द, धैर्य आणि देशप्रेमाच्या बळावर २६ वर्षे २४ दिवस भारतीय सैन्यात सेवा बजावली. १ ऑगस्ट २०२६ रोजी मराठा लाईट इन्फंट्रीमधून ईसीपी नाईक सुभेदार पदावरून ते सन्मानाने सेवानिवृत्त होत आहेत.


राकसकोप गावात जन्मलेले विष्णू मोटर हे लहानपणापासूनच धाडसी, कष्टाळू आणि निसर्गप्रेमी होते. कबुतरे पकडणे, झाडांवर चढणे, विहिरीत उतरून पक्ष्यांची घरटी पाहणे असे साहसी छंद जोपासताना त्यांचे शरीर आणि मन दोन्हीही कणखर बनले. गावातील सैनिकी परंपरेतून प्रेरणा घेत त्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्य भरतीची तयारी सुरू केली आणि सन २००० मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव येथे भारतीय सैन्यात भरती होण्याचा मान मिळवला.


प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांची १९ मराठा बटालियनमध्ये नियुक्ती झाली. ग्वाल्हेर, राजस्थान सीमेवर आणि त्यानंतर जम्मू-काश्मीर येथे त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत जबाबदारीने सेवा बजावली.


मात्र ११ सप्टेंबर २००४ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी गुप्त मोहिमेदरम्यान त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना घडली. मध्यरात्री बर्फवृष्टी आणि पावसात सुरू असलेल्या मोहिमेत त्यांच्या वाहनासमोर भीषण स्फोट झाला. वाहन दरीत कोसळले आणि विष्णू मोटर गंभीर जखमी झाले. मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या शरीराचा खालचा भाग निकामी झाला. तब्बल पंधरा दिवस ते कोमामध्ये होते. श्रीनगर, दिल्ली आणि नंतर पुण्यातील खडकी लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार झाले.


दोन वर्षे अंथरुणावर राहिल्यानंतर त्यांनी व्हीलचेअरचा आधार घेत नव्याने जीवनाला सुरुवात केली. सैन्याकडून स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देण्यात आला; मात्र "सीमेवर लढू शकत नसलो तरी देशासाठी इतर मार्गाने सेवा करीन," या निर्धाराने त्यांनी तो नाकारला. संगणकाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी पुणे व नंतर बेळगाव येथील लष्करी कार्यालयात प्रशासकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.


या संपूर्ण संघर्षमय प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. नंदा मोटर यांची साथ मोलाची ठरली. त्यांनी प्रत्येक क्षणी पतीचा आधार बनून त्यांची सेवा केली. तसेच त्यांचे बंधू, माजी सैनिक शिवाजी मोटर यांनीही त्यांना सातत्याने साथ दिली.


अपंगत्वावर मात करून राष्ट्रसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवणाऱ्या विष्णू मोटर यांनी आजच्या तरुणांसमोर जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल राकसकोप परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी आयुष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


देशसेवा हीच सर्वोच्च पूजा मानणाऱ्या या जिद्दी सैनिकाला सलाम! त्यांच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments